Thursday 14 July 2011

माझे मनोगत


।। श्री गजानन प्रसन्न ।।
      मी फोटोग्राफी या व्यवसायात आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे छायाचित्रण करताना माझी या विषयातील अभिरुची वाढली. विशेषतः लग्नसमारंभातील विविध प्रांतांतील विधींतील भिन्नता, अपुर्‍या माहितीमुळे होणारा गोंधळ हे सगळे पाहता, याचे कुठेतरी  विस्तृत माहितीपर विश्लेषण व्हावे, अशी मला इच्छा झाली. या संदर्भात माझ्या स्नेही मित्र पुरोहीतांकडून मी माहिती मिळवत गेलो. लग्नविधी हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. मग हिदू धर्मातील या सोळा संस्कारांचीच माहिती आपण ब्लॉगस्पॉटवर टाकावी. या हेतुने मी ही माहिती क्रमशः आपल्या समोर मांडत आहे.
       माझे मित्र उमेश जोशी. रा. कोर्‍याची वाडी, दाभोली, ता. वेगुर्ला, जि. सिधुदुर्ग यांनी मला ही माहिती पुरविण्याची कृपा केली. त्यांचे खूप आभार.
       वाचकांस दिलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचून ती सर्वश्रृत व्हावी हाच उद्देश. दिलेल्या माहितीतील त्रूटी, चुका वाचकांनी अवश्य सुचवाव्या. आपण दिलेल्या माहितीनुसार चुका सुधारल्या जातील.
       माझ्या या छोट्याशा उपक्रमाला आपण अवश्य प्रतिसाद देवून आपल्या आप्त, स्नेहींमध्ये ही माहिती नक्कीच पसरवाल हीच अपेक्षा.
आपला मित्र,
निलेश चेंदवणकर, 
इंद्रनिल डिजीटल फोटो स्टूडिओ,वेंगुर्ला
फोन-९४२२९६४४१६
             ।।श्री गौतमेश्वर प्रसन्न।।
              गर्भाधानं पुंसवनं सीमंतोन्नयनं तथा ।
              जातकं नामसंस्कारो निष्क्रमश्र्चान्नभोजनं ।
              चौलेर्मोपनयनं वेदव्रतचतुष्टयं ।
              केशांतस्नान मुद्वाहः संस्काराः षोडश स्मृताः ।
       ‘नमस्कार’. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या संस्कृतीत वरील सोळा संस्कार सांगितले आहेत. कित्येक ग्रंथकारांनी ४८, कोणी २५ असे संस्कार सांगितले आहेत.
       संस्कार म्हणजे काय तर गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात आई, वडील, आचार्य यांच्या कडून पूत्र किवा कन्या यांच्यावर त्यांच्याकडून सात्विक कृती व्हावी म्हणून जे विधी केले जातात. त्याला संस्कार असे म्हणतात. किवा संस्कार म्हणजे शुद्ध करणे, चांगले करणे. वैगुण्य दूर करुन तिला रुप देणे थोडक्यात ज्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी सद्गुणांचे संवर्धन होते त्याला संस्कार असे म्हणतात.
       सध्याच्या काल परिस्थितीप्रमाणे सर्व संस्कार विधी जसेच्या तसे आचरणात आणणे शक्य नसले तरी संस्काराचा मूळ उद्देश्य त्यांचे विधी जाणून घेतल्याने संस्कार कर्माची सार्थकता होते. संस्कार हे केवळ रुढी परंपरा म्हणून करण्यापेक्षा त्यांचे हेतू त्यामागील भावना जाणून ते व्हावेत. अशी अनेकांची इच्छा असते.
       ज्यावेळी एखाद्या घरात शुभकार्य असते त्यावेळी या गोष्टी सविस्तर माहित असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे. म्हणून प्रत्येक संस्कारात काय वैशिष्टय आहे याची पूर्वकल्पना असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पूर्वसूरींनी संस्कार योजना केली ती बहुत विचारपूर्वकच केलेली आहे. कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो, तसे आपली संतती योग्य झाली पाहिजे.
       तर प्रथमपासून म्हणजे गर्भाधान संस्कारापासून काळजीपूर्वक ते संस्कार समजावून घेतले तर त्यातील गांभिर्य आपणाला निश्चितच समजेल. असे मला वाटते. मी काही कोणी यामधील तज्ञ जाणकार नाही आजही या क्षेत्रात अनेक जाणकार, तज्ञ आहेत. परंतु गौतमेश्वर प्रेरणेने ही संस्कार माहिती सर्वांना मिळावी. असे वाटले म्हणून लिखाणप्रपंच हाती घेतला.
       माझ्याकडील उपलब्ध पुस्तकानुसार लिहीतो आहे. ज्ञानसागर प्रचंड मोठा आहे. त्यात मी हा केलेला अल्पसा लेखमालेचा प्रयत्न समजावा.
 श्री उमेश बाळकृष्ण जोशी, दाभोली

No comments:

Post a Comment